पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पुरंदर (Purandar) दौऱ्यादरम्यान केलेल्या कृतीने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. एका सामान्य कार्यकर्त्याला शरद पवारांनी कार्यालयातील खुर्चीवर हात धरुन बसवलं. मुख्य म्हणजे हा कार्यकर्ता खुर्चावर बसण्यास नकार देत होता. त्यामुळे शरद पवार यांनी या कार्यकर्त्याच्या हाताला धरलं. त्याला जबरदस्ती प्रेमाने खुर्चीपर्यंत आणलं आणि खाली बसवलं. शरद पवारांनी केलेल्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

शरद पवार हे सोमवारी पुरंदर दौऱ्यावर होते. यावेळी पुरंदर तालुक्यातील पर्रिचे येथील शेतकरी संवाद कार्यक्रमापूर्वी पुष्कराज जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.

सुरुवातीला पुष्कराज जाधव यांनी शरद पवारांना कार्यालयातील मुख्य खुर्चीवर बसण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी पुष्कराज जाधव यांना स्वतःच्या हाताने धरलं. त्यांच्या दंडाला पकडून खुर्चीपर्यंत आणलं आणि खुर्चीवर बसवलं.

पाहा व्हिडीओ :

शरद पवार यांनी सामान्य कार्यकर्त्यासोबत केलेली ही कृती त्यांच्या चाहत्यांना सुखावून गेली आहे. सोशल मीडियामध्ये शरद पवारांच्या या कृतीचं विशेष कौतुक होतंय. या घटनेचा व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावरुन पोस्ट केलाय. मोठ्या संख्येनं युजर्सनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.

शरद पवार यांच्या सुरक्षा रक्षकांनीही कार्यकर्त्याला खुर्चीत बसवण्यासाठी हातभार लावला. यानंतर शरद पवार यांनी इतर सर्व मंडळींसह फोटोही काढला.

राजकारण खुर्चीचं महत्त्व फार असतं, असं म्हणतात. त्यामुळे शरद पवारांनी स्वतःहून खुर्ची नाकारुन ती कार्यकर्त्याला दिली असल्याची घटना चर्चेत आली नसती, तरच नवल!

Leave a Reply